पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोडणार सोनिया गांधी; मिळणार नवा अध्यक्ष


नवी दिल्ली – देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, पक्षाचे गेल्या वर्षभरापासून हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली असून अध्यक्षपदावरील एक वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे आता आपण अध्यक्षपद सोडणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच सध्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यापैकी एका गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या गटाकडून गांधी परिवारातीलच कोणीही अध्यक्षपदी यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसची गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. पक्षात यानंतरही फारसे बदल झालेले नाहीत. काँग्रेसची अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. मोठ्या बदलांची गरज पक्षाला असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले आहे.

पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष पक्षाला गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. प्रभावी नेतृत्त्वाची पक्षाला गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचे काम प्रत्यक्ष दिसायला हवे. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असे २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.