जाणून घ्या सोशल मीडियात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत व्हायरल झालेल्या मेसेज मागील सत्य


देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था फार खिळखिळीत झाल्यामुळेच यंदा भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 2020-2021 या वर्षात पगार भेटणार नाही, अशा आशयाचा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाच्या या संकट काळात यापूर्वी देखील अनेक फेक आणि दिशाभूल करणारे मेसेजेस, न्यूज, माहिती व्हायरल झाली आहे. त्यात आता या नव्या मेसेजची भर पडली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

2020-21 मध्ये आपल्या कर्मचार्‍यांना पगार न देण्याचा निर्णय आर्थिक अडचणीमुळे भारतीय रेल्वेने घेतला असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या मागील सत्याचा उलगडा पीआयबी फॅक्ट चेकने केला आहे. हा दावा खोटा असून अशा प्रकारची कोणतीही चर्चा किंवा विचार रेल्वे मंत्रालयाने केलेला नाही, असे पीआयबीकडून ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाचा 2020-2021 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा पेन्शन न देण्याचा कोणताही विचार नाही. अशा प्रकाराचे कोणतेही पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण पीआयबकडून देण्यात आले आहे.