सीरम इन्स्टिट्यूटचा दावा! आगामी 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होणार स्वदेशी लस


पुणे : पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना देशाची पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ आगामी 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला आहे.

अधिकारी पुढे म्हणाले, आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना भारत सरकारने दिला असून आम्ही या अंतर्गत, चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे. जेणेकरुन 58 दिवसात चाचणी पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर 15 दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

7-8 महिन्यांचा कालावधी या लसीची चाचणी होण्यासाठी लागेल, असे सांगितले जात होते. पण सध्या 17 सेंटरवरील 1600 लोकांवर 22 ऑगस्टपासून चाचणी करण्यात आली आहे. 100 स्वयंसेवक प्रत्येक सेंटरवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस सीरम इंस्टिट्यूटची असणार आहे. कंपनीने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. जेणेकरून सीरम इंस्टीट्यूट ही लस भारत आणि जगातील इतर 92 देशांना उपलब्ध करुन देईल. त्या बदल्यात सीरम इन्स्टिट्यूट अ‍ॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी फी देणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून केंद्र सरकार 68 कोटी लस खरेदी करणार आहे. राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत केंद्र सरकार भारतीयांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. भारताची लोकसंख्या सध्या सुमारे 130 कोटी आहे. सीरमकडून 68 कोटी डोसची खरेदी केल्यानंतर उर्वरित लशीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या कोवॅक्सिन तसेच खासगी फार्मा कंपनी Zydus Cadila द्वारे विकसित होत असलेल्या ZyCoV-D ऑर्डर देऊ शकतात. पण या कंपन्यांच्या कोरोना लस चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत अशी माहिती ‘बिझनेस टुडे’ने दिली आहे.