‘राफेलसाठी भारतीय राजकोषातून पैसे चोरले’, राहुल गांधींचा सरकारवर घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कोरोना व्हायरसची स्थिती आणि आर्थिक मुद्यांवरुन वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी राफेल विमानावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राफेल विमानासाठी भारतीय राजकोषातून पैसे चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एका बातमीचा संदर्भ देत ट्विट केले की, राफेलमध्ये भारतीय तिजोरीतून पैसे चोरी करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधींच्या एका विचाराचा उल्लेख करत लिहिले की, सत्य एक आहे, मात्र रस्ते अनेक आहेत.

राहुल गांधी यांनी ज्या बातमीचा संदर्भ दिला त्यानुसार, कॅगने संरक्षण मंत्रालयाच्या ऑफसेट कराराबाबत आपला परफॉर्मेंस ऑडिट रिपोर्ट सरकारला सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भाबाबत कोणत्याही ऑफसेट कराराचा उल्लेख नाही.

राहुल गांधींच्या या आरोपानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील पलटवार करत लिहिले की, राहुल गांधींचे अनेक सहकारी खाजगीमध्ये सांगतात की, वडिलांचे पाप धुण्यासाठी राफेलबाबत राहुल गांधींना जो ध्यास आहे त्यामुळे पक्षाला नुकसान पोहचत आहे. मात्र जर कोणाला स्वतःलाच उद्धवस्त करायचे असल्यास, तक्रार करणारे आम्ही कोण ? गोयल यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक राफेलच्याच मुद्यावर लढण्यासाठी देखील राहुल गांधींना निमंत्रित केले.