पाक फलंदाजाने शोएब अख्तरकडे केली होती मुरलीधरनची बोटे तोडून टाकण्याची मागणी


आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणार पाक संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर कायमच चर्चेत असतो. त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळात त्याच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याचदरम्यान त्याच्याकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत-पाक सामने खेळवण्याचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर माझ्या गोलंदाजीला टीम इंडियाचे तळाचे फलंदाज घाबरायचे, असे वक्तव्य त्याने केले होते. आता तो पाक संघाच्या एका माजी खेळाडूच्या वक्तव्याबद्दल मुलाखतीत सांगितल्यामुळे चर्चेत आला आहे.

शोएब अख्तर क्रिककास्ट या यु-ट्यूब कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी बोलताना त्याने पाक संघातील त्याचा सहकारी मोहम्मद युसुफ याने मला श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन याची बोटे तोडून टाकायला सांगितल्याचा दावा त्याने केला. मुरलीधरन फलंदाजीस आला की युसुफ मला मुरलीधरनला चेंडू मारायला सांगायचा. त्याची फिरकी गोलंदाजी मला खेळता येत नाही. तू त्याची बोटे तोडून टाक, असेही तो मला वारंवार सांगायचा. त्यानंतर एक दोन वेळा मी मुरलीधरनला बाऊन्सर चेंडू टाकून घाबरवले देखील होते. पण तेव्हा मुरलीने मला सांगितले होते की असे चेंडू टाकू नको. मला चेंडू लागला, तर मी मरून जाईन, असा किस्सा अख्तरने सांगितला.

अख्तरने इतर तळाच्या फलंदाजांबाबतही सांगितले. चेंडू मला मारू नको, असे तळाला फलंदाजी करण्यासाठी येणारे अनेक खेळाडू मला सांगायचे. मुरलीधरनही देखील त्यातीलच एक होता. अनेक भारतीय तळाचे फलंदाज माझ्याकडे विनवणी करायचे की आम्हाला चेंडू मारू नको, आमच्या घरी आमचे कुटुंब आहे. मुरलीधरन तर मला सांगायचा की तू धीम्या गतीने चेंडू टाक, मी स्वत:तूनच बाद होतो, असे अख्तरने नमूद केले.