सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंचे नाव कधीच घेतले नाही – नितेश राणे


मुंबई – आदित्य ठाकरेंचे नाव घ्यावेसे रिया चक्रवर्तीला का वाटले? आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती सीबीआयला करणार असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरेंचे नाव आम्ही कधीच घेतले नाही, आम्ही फक्त युवा नेता असा उल्लेख करत आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कोणत्याही युवा नेत्याचे नाव घेतलेले नाही. भाजपच्या इतर नेत्यांनी देखील युवा मंत्री असे म्हटले आहे. अनेक तरुण मंत्री कॅबिनेटमध्ये आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच फक्त आपणच कॅबिनेट मंत्री असल्याचे वाटत आहे, त्यामुळे आश्चर्य वाटत असल्याचे नितेश राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे. याप्रकरणी अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावेसे का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

१३ तारखेला पार्टी झाली असे अनिल परब यांनीच ट्विट करत सांगितले. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे यांचे नाव संजय राऊत स्वत:च घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत, हे मलाच विचारायचे आहे. हे सर्वकाही शिवसेनेचे नेते जाणुनबुजून करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

तसेच शिवसेनेत काँग्रेसप्रमाणे जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. जुन्या शिवसैनिकांवर शिवसेनेत अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. याबाबत अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

राजकारण इशाऱ्यावर केले जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. जी माहिती माझ्याकडे आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. माझ्याकडे असणारी माहिती मागितल्यास आपण देण्यास तयार असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.