महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवर रोखले!


आझमगड : उत्तर प्रदेशच्या आझमगड सीमेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना रोखण्यात आले असून आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर डॉ. राऊत हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. याबाबतची माहिती डॉ. राऊत यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे.

आझमगड सीमेवर डॉ. नितीन राऊत हे आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. बांसा येथे आपल्याला जायचे आहे, असे राऊतांनी पोलिसांना सांगितले. पण कोणालाही बांसामध्ये जाण्याची परवानगी नसल्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगितल्यानंतर राऊत यांनी तिथेच धरणे आंदोलन केले.

उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील बांसा गावात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दलित सरपंचाची हत्या झाली होती. सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. नितीन राऊत पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात होते.

या प्रकरणाचे सत्य पडताळण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी एक सत्य-शोध समिती गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन राऊत यांचा या समितीमध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस खासदार पीएल पुनिया हे देखील नितीन राऊत यांच्यासोबत उपस्थित राहणार होते.

अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. डॉ राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशभरात दलितांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा विभाग पीडितांसाठी मदतीसाठी तत्परतेने काम करत आहे. तसेच त्यांना तात्काळ न्याय मिळेल यासाठीही काम करत असल्यामुळे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणाच्या सत्य-शोध समितीमध्ये सामील करण्यात आले आहे.