पार्थ पवार यांच्याबाबत कोणताही प्रतिक्रिया देण्यास सुप्रिया सुळेंचा नकार


मुंबई : आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधत आपण पार्थच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो अजून इमॅच्युअर असल्याचे म्हटले होते. काहीच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणी भेट घेतली होती. त्यांनी या भेटीमध्ये सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर काल सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिल्यानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते असे ट्विट केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडत पार्थ पवार यांच्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पार्थ पवारांना जाहीरपणे शरद पवारांनी फटाकरले होते. तरीही सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर याबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता, त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. पार्थ पवार यांनी या मागणीचे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून दिल्यानंतर शरद पवारांनी पार्थ पवारांना खडसावले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले. पवार कुटुंबातील अनेकांची त्यांनी भेट घेतली. तसेच पार्थ पवार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, त्याआधी ते कुटुंबाची भेट घेत असल्याचीही चर्चा होत होती.

आज मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली. स्वच्छतेचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार बारामती मतदारसंघातील सासवड गावाला मिळाला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तेथील नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. लावणी कलाकारांच्या प्रश्नावरही त्यांच्याशी चर्चा केली. जिम सुरु करण्याची मागणी आहे, त्या सुरू कराव्या अशी मागणीही केली, असं सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्यावर म्हणाल्या.