भारतातून आपले बस्तान गुंडाळणार लोकप्रिय बाईक कंपनी

लोकप्रिय बाईक कंपनी हार्ले डेव्हिडसनला भारतीय बाजारात पाऊल ठेवून एक दशक उलटले आहे. मात्र आता कंपनी बाईक्सची विक्री कमी होत असल्याने भारतातील आपले अ‍ॅसेंबली ऑपरेशन्स बंद करण्याची शक्यता आहे.

द हिंदूच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या या प्रसिद्ध बाईक कंपनीने सल्लागारांच्या माध्यमातून हरियाणामधील बावल येथील भाडेतत्वावर घेतलेल्या प्लांटच्या संभावित आउटसोर्सिंगसाठी ऑटोमोबाईल निर्मात्यांशी चर्चा सुरू केली आहे. कंपनी उत्तर अमेरिका, यूरोप आणि आशियातील इतर काही भागातील बाजारांवर लक्ष केंद्रीत करण्याचा विचार करत आहे.

होर्ले डेव्हिडसनने मागील महिन्यात आपल्या दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्नांची माहिती देताना म्हटले होते की, जेथे उत्पादन आणि लाभ मिळत नाही, अशा बाजारातून कंपनी बाहेर पडण्याचा विचार करत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हार्डे डेव्हिडसन इंडियाने मागील आर्थिक वर्षात 2,500 पेक्षा कमी यूनिट्सची विक्री केली. तर एप्रिल-जून 2020 मध्ये 100 पेक्षा कमी बाईक्सची विक्री केली आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतातील व्यवसाय बंद करणारी हार्ले डेव्हिडसन दुसरी अमेरिकन वाहन निर्माता कंपनी असेल. 2017 मध्ये जनरल मोटर्सने देखील आपला गुजरात प्लांट विकला होता.