बराक ओबामा यांनी चांगले काम केले असते, तर मी निवडणूक लढवली नसती


वॉशिंग्टन – माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी चांगले काम केले नसल्यामुळेच आज मी तुमच्यासमोर राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा आहे. त्या दोघांनी जर चांगले काम केले असते तर मी येथे नसतो. कदाचित मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकही लढवली नसती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बिडेन आठ वर्षे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. यावेळी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ते डेमोक्रॅटिकच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ बिडेन मोहिमेद्वारे बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. ते त्यात म्हणाले, राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी देशाला निराश केले आहे. मला आशा होती की, ते देशहितासाठी त्यांचे कार्य गांभीर्याने घेतील. पण त्यांनी ते कधीच केले नाही. राष्ट्राध्यक्षांसारखी क्षमता त्यांच्यात येऊ शकली नाही. कारण ते त्यास पात्र नाहीत. त्यांच्यामुळे 1.70 लाखाहून अधिक अमेरिकन लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या सामील झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, आपल्या देशासाठी ट्रम्प हे चुकीचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांची देशाला गरज नाही. ट्रम्प काम करू शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अनेक संधी मिळाल्या. पण त्यांनी अडचणी जास्त वाढवल्या आहेत. सध्याच्या काळानुसार ते ठीक नाहीत. दरम्यान ट्रम्प मिशेल ओबामा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, त्यांचे भाषण लाइव्ह नव्हते. बऱ्याच काळापूर्वी ते रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यांनी भाषणात उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा उल्लेखही केला नाही.