‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही’; रोहित पवारांचे भाजपला खडेबोल


मुंबई : बिहार सरकारची अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळे भाजपने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका सुरु केली. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावर भाजपला ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’, अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतसिंहला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसेच राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या चौकशीचा मला आदर असून या संस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपचे मोठे नेते सर्वोच्च न्यायालयावर टीका करत होते. याचा आज सर्वोच्च न्यायालयावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टीका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

यानंतर रोहित पवार यांनी पुन्हा काही ट्विट करत भाजपला सुनावले आहे, आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपने राज्याचा नावलौकिक घालवण्याचेच काम केले आहे, अशी टीका करतानाच ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ अशा शब्दांच सुनावले आहे. तसेच न्यायालयानेच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले हे बरे झाले. पण बिहारची राजकीय पोळी यानिमित्ताने भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचे ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’, असेही म्हटले आहे.