सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या शार्पशूटरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


नवी दिल्ली : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला असून या प्रकरणाला अंतिम स्वरुप देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सलमानची माहिती गोळा करण्यासाठी शार्प शूटर असलेल्या आरोपीने रेकी केली होती. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर सलमान खान असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवानी जिल्ह्यातील 27 वर्षीय राहुल संगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी अटक केली. उत्तराखंडच्या हिस्सारमध्ये सध्या तो राहत होता. त्याचबरोबर त्याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. त्याला चौकशीसाठी फरीदाबाद येथे आणण्यात आले होते. पोलीस एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरवर देखील जप्त करण्यात आले आहे.

याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईच्या वांद्र्यात राहुल गेला होता, जिथे सलमान खानचे घर आहे. राजस्थानच्या जेलमध्ये असेलल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निर्देशानुसार राहुलने सलमान खानची आणि हालचालांची तीन दिवस रेकी केली होती.

काळवीट शिकारी प्रकरणात सुटका झालेला सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर होता. यासाठी त्याने मागील वर्षी एका गँगस्टरलाही सलमानच्या मागावर पाठवले होते. शार्प शूटर राहुलची इतर प्रकरणांमध्ये मदत केल्याच्या आरोपात इतर जार जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मनीष, रोहित, आशीष आणि भारत अशी अटक केलेल्यांची नावे आहे. राहुल, भरत आणि आशिषला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याआधी हरियाणा पोलिसांनी शार्पशूटर संपत नेहराला जून महिन्यात हैदराबादमधून अटक केली होती. तो देखील सलमान खानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मुंबईला गेला होता.