मुस्लिमांची मशीद तोडून चीनने त्याजागी उभारले सार्वजनिक शौचालय


शिनजियांग – एकीकडे चीनचे गुनगान करताना न थकणाऱ्या पाकिस्तानला चीनने आपला खरा चेहरा दाखवला आहे. दरम्यान चीनमध्ये असलेल्या उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भातील बातम्या वारंवार माध्यमांमध्ये झळकत असतात. त्यातच आता उइगर मुस्लिमांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठी चीनमधील जिनपिंग सरकारने एक मोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

उइगर मुस्लीमांच्या धार्मिक विधीवर याच मोहिमेअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अगदी टोपी घालण्यावर तसेच घरात कुराण ठेवण्यावरही जिनपिंग सरकारने बंदी घातली आहे. मुस्लीम समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशिद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. तसेच इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या असल्याचे वृत्त रेडिओ फ्री एशियाने दिले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी अतुश सुंथग या गावामध्ये एकूण तीन मशिदी होत्या. त्यापैकी तोकुल आणि अजना मशिद पाडण्यात आल्या आहेत. तोकुल मशिदीच्या जागी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. हे काम जिनपिंग सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येत असल्याचे रेडिओ फ्री एशियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

२०१६ साली सरकारने मशिदींची संख्या कमी करण्यासाठी आणि कट्टरतावादावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. मोठ्याप्रमाणात मशिदी, दर्गे आणि मुस्लिमांच्या स्मशानभूमी या मोहिमेच्या नावाखील तोडण्यात आल्या आहेत. या गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय आहे. येथे फारसे पर्यटकही येत नसल्यामुळे मशीद पाडून त्याजागी शौचालय उभारण्याची गरज नसल्याचे मत अतुश सुंथग गावातील उइगर मुस्लीम कमिटीच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे.

मशीद पाडून त्याजागी शौचालय उभारण्याच्या निर्णयाचा उइगर मुस्लीम कमेटीच्या प्रमुखांनी विरोध केला असून यासंदर्भातील नाराजी सरकारी यंत्रणांच्या कानावर घातली आहे. कोणी पर्यटक गावामध्ये येत नाही तर सार्वजनिक शौचालय बांधण्याची गरज काय होती असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तोकुल मशीद तोडून शौचालय उभारल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर अन्य एका जागी मशीद पाडून त्या ठिकाणी एक दुकान सुरु करण्यात आले आहे. या दुकानामध्ये सिगारेट आणि दारुची विक्री केली जाते. मशिदी पाडून त्या जागी इतर इमारती उभारण्यामध्ये चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांचा समावेश आहे. मशिदींची डागडुजी करण्याच्या नावाखाली शिनजियांग प्रांतामध्ये चीन सरकारने जवळजवळ ७० टक्के मशिदी पाडल्या आहेत असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

यासंदर्भात एएफपी या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, २०१४ पासून ऑक्टोबर २०१९ पर्यंत या परिसरामध्ये ४५ कब्रस्तान तोडण्यात आले. त्या ठिकाणी गार्डन किंवा पार्कींग लॉट तयार करण्यात आले. वॉशिंग्टनमधील उइगर ह्युमन राइट्स प्रोजेक्टने केलेल्या अभ्यासामध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान शिनजियांगमध्ये १५ हजार मशिदी आणि दर्गे तोडण्यात आल्याचा दावा केला आहे.

२०१४ नंतर चीनमध्ये दहशतवादीविरोधी मोहिमेअंतर्गत २० लाख उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या भागामधील कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी ‘व्होकेशनल ट्रेनिंग कॅम्प’ चालवण्यात येत असल्याचे चीनने अनेकदा स्पष्ट केले आहे. पण या कॅम्पमध्ये कैद्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.