धान्यांच्या तुटवड्यामुळे किम जोंगने नागरिकांना दिले कुत्रे मारुन खाण्याचे आदेश


प्योंगप्यांग – कोरोनासोबतच आणखीन एक मोठे संकट उत्तर कोरियावर ओढावले असून जे सर्व सामान्यांना त्रासदायक ठरत आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोनासोबतच अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने याच संकटाला तोंड देण्यासाठी अन्नधान्य विकत घेणे किंवा शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्याऐवजी कुत्र्यांना ठार करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर कोरियातील कुत्रे पाळणाऱ्यांमध्ये किम याच्या या आदेशानंतर भीतीचे वातावरण आहे. किम याने जुलै महिन्यामध्ये कुत्रा पाळण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली होती. कुत्रा पाळणे हे भांडवदारी विचारसरणीचे लक्षण असल्याचे किम याने म्हटले होते. यासंदर्भातील वृत्त दक्षिण कोरियामधील चोसुन इल्बो या वृत्तपत्राने दिले असून सरकारी अधिकाऱ्यांनी किम यांच्या आदेशानंतर कोणत्या घरांमध्ये कुत्रे पाळण्यात आले आहेत त्याची चाचपणी करण्यास सुरुवात केल्याचेही म्हटले आहे. हे सर्व कुत्रे जप्त करुन त्यांना सरकारी प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येईल आणि नंतर हे कुत्रे मांस विक्री करणाऱ्या हॉटेलला विकली जातील असे सांगण्यात येत आहे.

कुत्र्याचे मांस कोरियामध्ये लोकप्रिय असून कुत्र्याचे मांस खाण्याचे प्रमाण दक्षिण कोरियामध्ये हळूहळू कमी होत आहे. असे असले तरी वर्षाला १० लाख कुत्र्यांचा बळी मांसांसाठी दिला जातो. कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांची संख्या उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियापेक्षा अधिक आहे. प्योंगयांगमध्ये तर कुत्र्याचे मांस मिळणारी विशेष हॉटेल्स आहेत. उन्हाळ्यामध्ये कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते.

शरीरामधील ताकद आणि शारीरिक क्षमताही कुत्र्याचे मांस खालल्याने वाढते, असे सांगण्यात येते. कोरियात हिवाळ्यामध्ये भाज्यांबरोबर कुत्र्याच्या मांसाचे सूप प्यायले जाते. थंडीमध्ये शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कुत्र्याच्या मांसांचे सूप प्यायले जाते. तर काही प्राणीमित्रांनी किम यांचा हा आदेश चुकीचा असल्याचे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. पण तेथील एकाधिकारशाहीमुळे उघडपणे कोणीही या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुढे येताना दिसत नसल्यामुळेच या आदेशांची अंमलबाजवणी करण्याशिवाय प्राणीमित्रांकडे इतर पर्याय उपलब्ध नाही.

संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या एका अहवालामध्ये उत्तर कोरियामधील ६० टक्के म्हणजेच २ कोटी ५५ लाख लोकांना अन्न धान्याच्या तुटवडा जाणवत आहे. उत्तर कोरियामध्ये अन्नधान्य आयात करण्यात अण्विक क्षेपणास्त्र आणि इतर निर्बंधांमुळे अडचणी निर्माण झाल्याने हा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या बाजूची सीमा कोरोनामुळे बंद करण्यात आल्याने परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. चीनमधून तेथे मोठ्या प्रमाणात धान्याची आयात होते. पण आता त्यावरही कोरोनाचा प्रभाव जाणवू लागल्याचे दिसत आहे. उत्तर कोरियामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मागील वर्षी धान्याचे उत्पादनही अपेक्षेऐवढे झालेले नाही.