कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ‘हा’ देश आपल्या देशवासियांना देणार मोफत डोस


मेलबर्न – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अद्यापही कायम आहेत. त्यातच जगभरातील अनेक देश या रोगाचे समूळ नाश करणारे औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. पण अद्याप म्हणावे तसे यश कोणत्याही देशाला मिळालेले नाही. त्यातच लस विकसित केल्याचाही दावा रशियाने केला आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वसामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार असे अनेक प्रश्न समोर आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर देशवासियांना मोफत डोस दिले जाणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाने केली आहे.

यासंदर्भात बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोना लस विकसित करणाऱ्या AstraZeneca या औषध कंपनीसोबत ऑस्ट्रेलियाने करार केला आहे. जर कोरोना प्रतिबंधक लस यशस्वी झाली तर आम्ही त्याची निर्मिती करुन आणि पुरवठाही सुरु करु, त्याचबरोबर देशातील २५ कोटी नागरिकांसाठी ती मोफत उपलब्ध असेल, असे पतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील २३ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून तर ४३० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताने कोरोना लस विकसित करणाऱ्या तीन कंपन्यांना लस उपलब्ध झाल्यास कोणत्या किंमतीत ती उपलब्ध करु शकतो यासंबंधी विचारणा केली आहे. भारतातील लस सध्या मानवी चाचणी टप्प्यात आहेत. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि अहमदाबाद स्थित झायडूस कॅडिला सध्या पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करत आहेत. तर AstraZeneca आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्याकडूनही कोरोना लस विकसित केली जात असून भारतात मानवी चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.