डिस्चार्ज दिलेल्या राणा दाम्पत्याला पुन्हा कोरोनाची लागण


मुंबई : मुंबईतील लीलावती रुग्णालयातून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. पण डिस्चार्ज दिलेल्या राणा दाम्पत्याची मुंबई महानगरपालिकेने पुन्हा कोरोना चाचणी केली असता. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे दोघांनाही मुंबई महानगरपालिकेने होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर मुंबईत होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये सासू, सासरे, दोन मुले, आमदार रवी राणा यांचा समावेश आहे. नवनीत राणा व त्यांच्या पतीवर नागपूर वोक्हार्ट रुग्णालयात ६ ऑगस्टपासून उपचार सुरू होते. नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरहून त्यांना व त्यांच्या पतीला वांद्रेतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.

नवनीत राणा २३ तासांचा प्रवास करून १४ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचल्या होत्या. त्यानंतर, त्यांच्या प्रकृतीत शनिवारी १५ ऑगस्टला सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात आणण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार, असे नवनीत राणा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच प्रकृती सुधारल्याने शनिवारी रात्री उशिरा दोघांनाही लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.