जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या पुण्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटामागील सत्य

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे अनेक सेवा देते. मात्र काही सेवांसाठी रेल्वे अधिक पैसे घेते अशाही अनेकदा तक्रारी असतात. पुणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिट तब्बल 50 रुपये करण्यात आले आहे. अवघ्या 10 रुपयांच्या तिकिटाची किंमत 5 पटींनी वाढवून 50 रुपये केल्याने सोशल मीडियावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आता यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, रतलाम आणि भावनगर या सर्व 6 डिव्हिजनचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आलेले आहे. रेल्वे प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, पुणे जंक्शनद्वारे प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये ठेवण्याचा उद्देश विनाकारण स्टेशनवर येणाऱ्या लोकांना रोखणे हा आहे. जेणेकरून सोशल डिस्टेंसिंगचे पालन होईल. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरांना कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीपासूनच नियंत्रित करत आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटामुळे दोन तास प्लॅटफॉर्मवर थांबण्याची परवानगी मिळत असते. म्हणजेच तुम्ही दोन तास आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा तेथून घेण्यासाठी थांबू शकता. हे तिकिट तुम्ही ऑनलाईन यूटीसी अ‍ॅपद्वारे खरेदी करू शकता. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळत नाही.