भारताचा विरोध करणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची आमिर खानने घेतली भेट, झाला ट्रोल


नवी दिल्ली : सध्या आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान तुर्कीमध्ये गेला असून आपल्या आगामी चित्रपटाचे तो तिथे शुटिंग करणार आहे. तुर्कीतून त्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत या फोटोंमध्ये दिसून आला आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट या फोटोवरून सोशल मीडियावर प्रचंड चांगलाच ट्रोल होत आहे.

एमीन एद्रोगनने आपल्या ट्विटर हँडलवर आमिर खानसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फोटो शेअर करताना लिहिले आहे की, जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तानबुलमध्ये आहेत. हे जाणून घेऊन मला आनंद होत आहे की, आमिर लवकरच आपला आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’चे शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.

पण आपल्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर आमिर खान ट्रोल होत आहे. दरम्यान, आमिरवर होत असलेल्या ट्रोलिंगसाठी आमिरची काहीही चूक नाही. खरे तर जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश असल्यामुळेच आमिर खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

तुर्कीने जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर या निर्णयाचा विरोध केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हागिया सोफिया म्युझियनला पुन्हा मशीद बनवण्याच्या मुद्द्यावरून तुर्कीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. आमिर खानने एमीन अर्दोआन ज्यांची भेट घेतली, त्या नेहमी हिजाब घालतात. परंतु, तुर्कीमध्ये हिजाबवर बंदी होती. हिजाब घालून मुली युनिवर्सिटीत जाऊ शकत नव्हत्या. परंतु, अर्दोआन यांच्या पत्नी हिजाबमुळेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. काही लोक आमिरला या कारणामुळेही ट्रोल करत आहेत. तसेच भारतात असहिष्णुता असल्याच्या आपल्या जुन्या वक्तव्यामुळेही आमिर खान ट्रोल होत आहे. तसेच पीकेमध्ये हिंदु धर्माची चेष्ठा केल्याचाही आमिरवर आरोप लावण्यात येत आहे.