ड्रोनच्या धडकेतून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान


वॉशिंग्टन – वॉशिंग्टन विमानतळावर आकाशात उडणारी एक ड्रोन सदृश्य वस्तू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या जवळून गेली, पण सुदैवाने त्यांच्या विमानाचा मोठा अपघात टळला. हा प्रकार एअरफोर्स वन हे ट्रम्प यांचे विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना घडला. या विमानात यावेळी अनेक जण असल्याचे वृत्त टाइम्सनाऊने दिले आहे.

यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे एअरफोर्स वन हे विमान रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी लँड होत असताना पिवळ्या आणि काळ्या रंगाचे एक उपकरण उडताना विमानाच्या अगदी जवळ आले होते. विमानाच्या उजव्या बाजूला ते धडकणार होते, पण हा अपघात थोडक्यात टळला.

या प्रकरणी सिक्रेट सर्व्हिसकडे उत्तर अमेरिकेतील हवाई सुरक्षा उपायांचे समन्वय साधणाऱ्या उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने अहवाल मागितला आहे. अमेरिकेच्या वायुसेनेकडे याबाबत फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने विचारणा केली होती. तसेच व्हाइट हाउसचे मिलिटरी ऑफिस आणि एअरफोर्सच्या ८९व्या एअरलिफ्ट विंगने एका स्टेटमेंटद्वारे सोमवारी संध्याकाळी सांगितले की, आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दरम्यान, काही किलोग्रॅम एवढे बहुतेक नागरी ड्रोन्सचे वजन असते आणि बहुधा ते जेटलाइनर जवळ खाली उतरु शकत नाही. पण सरकारी संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे विमानाच्या कॉकपीटच्या विंडशिल्डला हे ड्रोन्स नुकसान पोहोचवू शकतात किंवा संपूर्ण इंजिनचेही नुकसान करु शकतात. ड्रोन्समुळे विमानांना अडथळा होण्याच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. पण यामुळे अद्याप कुठलाही मोठा विमान अपघात किंवा कोणी जखमी झाल्याची घटना घडली नसल्याचे नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डने (एनटीएसबी) म्हटले आहे.