‘तुम्ही आणि तुमच्या आईने चीनकडून पैसे घेतले’, भाजप अध्यक्षांचा राहुल गांधींवर आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीएमकेअर्स फंडवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयाने पीएम केअर्सची माहिती मिळवण्यासाठी दाखल केलेली आरटीआयच्या फेटाळली, अशा आशयाची बातमी शेअर केली होती. सोबतच पंतप्रधान केवळ अप्रामाणिकतेच्या अधिकाराची काळजी करतात, असा खोचक टोला लगावला होता. आता यावरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर थेट चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, जेव्हा प्रिन्स ऑफ इन्कॉपिटेंस विना वाचता लेख शेअर करतात, तेव्हा असेच होते. आरटीआयला दुसऱ्या आरटीआयबद्दल जाणून घेण्यासाठी दाखल केले होते. तुम्ही दुर्भावनेने पारदर्शकतेवर हल्ला केला. हे स्वाभिवकच आहे, तुमचे करिअर खोट्या बातम्या पसरवण्यावरच टिकले आहे.

नड्डा यांनी आणखी एक ट्विट करत लिहिले की, तुमच्या कुटुंबाच्या संशयित वारशामध्ये पीएमएनआरएफमध्ये स्थायी जागा मिळवणे आणि त्यानंतर त्यातील पैसा कुटुंबाच्या ट्रस्टमध्ये समावेश करण्याचाच समावेश आहे. तुम्ही आणि तुमच्या आईने राष्ट्रीय हिताला नुकसान पोहचवण्यासाठी चीनकडून देखील पैसे घेतले. तुम्ही एवढ्या खालच्या स्तराला जावू शकता ?

संपुर्ण देश एकत्र येऊन कोव्हिड-19 शी लढत असताना, तुमच्यासारखे पराभव झालेले केवळ फेक न्यूजच पसरवू शकतात, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.