चिंताजनक! भारतात दिवसागणिक आढळत आहेत अमेरिका, ब्राझीलपेक्षा जास्त कोरोनाबाधित


नवी दिल्ली – देशात मागील आठवड्याभरात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी चिंता वाढवणारी असून या संकटामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात दिवसागणिक हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत असून, देशातील मागील सात दिवसातील आकडेवारीमुळे आपला देश कोरोना उद्रेकाचा जागतिक केंद्रबिंदू ठरला आहे. दिवसेंदिवस देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून, भारतात गेल्या सात दिवसांत अमेरिका व ब्राझील या दोन देशांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

मार्च महिन्यात देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर देशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतरही देशातील कोरोनाचा वाढणार प्रादुर्भाव थांबलेला नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली असून, त्यातच देशातील या रोगामुळे जीव गमावलेल्यांचा आकडाही ५० हजारांच्या पुढे गेला आहे. या चिंतेत आता आणखी एका गोष्टीची भर पडली असून, मागील काही दिवसांतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक पातळीवर भारत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरला आहे.

भारतात मागील सात दिवसांत सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जॉन हाफकिन्स विद्यापीठाच्या माहितीप्रमाणे दररोज ६० हजारांच्या सरासरीने भारतात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा अधिक ही संख्या आहे. त्यातच भारतातील परिस्थिती चिंताजनक होत चालली असून, भारतात रुग्णसंख्या वाढीचा वेग ब्राझील व अमेरिकेपेक्षा जास्त आहे. ब्राझीलचा रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ४७ दिवसांचा आहे, तर अमेरिकेचा ६५ दिवसांचा आहे.

दुसरीकडे भारताचा दुपटीचा कालावधी २४ दिवसांचा आहे. अमेरिकेत २२ जुलै रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येचा उद्रेक झाला. अमेरिकेत याच कालावधीत सात दिवसात ६७ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून आले. ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होती. हा विक्रमी आकडा भारत लवकरच पार करेल, असे सध्याच्या रुग्ण वाढीवरून दिसून येत आहे.