कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा शिरकाव; वाढवला लॉकडाऊन


ऑकलंड : कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंड या देशाचे जगभरात खूप कौतुक झाले. त्याचबरोबर त्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. पण या कोरोनामुक्त झालेल्या देशात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला असून, मागील 24 तासात न्यूझीलंडमध्ये 13 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे न्यूझीलंडमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे.

न्यूझीलंडसाठी ही बाब चिंताजनक यासाठी आहे की, न्यूझीलंडने जून महिन्यातच कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर 100 दिवसात एकही रुग्ण आढळला नसल्याचे जाहिर केले होते. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात शिरकाव केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

याबाबत आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांच्या माहितीनुसार, ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित सर्व नवे कोरोनाबाधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये आला होता. तो सुरुवातीला कोरोना निगेटिव्ह होता. पण 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईन पीरियडच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईनमध्ये आहे. तर इतर 12 कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते.

नव्या कोरोनाबाधितांसह न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या आता 1271 झाली आहे. त्यामध्ये 69 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी (14 ऑगस्ट) ऑकलंड क्षेत्रात अलर्ट 3 लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट 2 लॉकडाऊन घोषित करुन पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी लॉकडाऊन 26 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 12 दिवसांचा असेल. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये एक महिन्यात राष्ट्रीय अलर्ट 4 स्तरावरचा लॉकडाऊन केल्यानंतर जून महिन्यात कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारा तो पहिला देश बनला होता. परंतु 102 दिवसांच्या अंतरानंतर मागील आठवड्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.