राज्यपालांचा फिटनेस पाहून अधिकारीही अवाक; अवघ्या ५० मिनिटांत सर केला शिवनेरी


पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.

रविवारी पायी चालत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ली सर केला. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. दरम्या राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते गडावरील शिवाई देवीची आरती करण्यात आली. त्याचबरोबर शिवनेरी गडावर भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी जिजाउ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. याचसोबत गडावरील इतर ऐतिहासिक गोष्टीही राज्यपालांनी मन लावून पाहिल्या.

कोश्यारी शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेसमोर लीन होऊन नतमस्तक झाले. शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पुजा आणि प्रतिमेचे पुजन करून राज्यपालांच्या हस्ते खास वृक्षारोपण करण्यात आले. या भेटीदरम्यान राज्यपालांनी गडावरील विविध प्रकारच्या वनस्पतींची नाव विचारुन प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस दाखवला. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या प्रत्येक गड-किल्ल्याचे संवर्धन हे व्हायलाच हवे. प्रत्येक मंत्र्याला यासाठी एक किल्ला संवंर्धनासाठी द्यायला हवा, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, आमदार अतुल बेनके व इतर अधिकारी उपस्थित होते. कोश्यारी यांनी अवघ्या ५० मिनिटांमध्ये हा गड सर केला. राज्यपालांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

तत्पूर्वी शनिवारी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी कोश्यारी यांनी पुणे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देऊन राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या वास्तूची पाहणी केली होती. शनिवार वाड्यासंदर्भातील बरीच माहिती कोश्यारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये फोटो काढून घेण्याचा मोह कोश्यारी यांना आवरला नाही. त्यांनी अशी खास पोज देत फोटो काढून घेतला. शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वच अधिकाऱ्यांनी राज्यापालांबरोबर असा ग्रुप फोटो काढला.

दरम्यान छत्रपती संभाजी राजेंनी राज्यपाल कोश्यारी यांचे कौतूक करत एक ट्विट केले असून, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी ‘पायी’ सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो, असे म्हटले आहे.