वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या धोरणाबद्दल केलेल्या दाव्यानंतर फेसबुकने केला खुलासा


नवी दिल्ली – वॉल स्ट्रीट जर्नलने कालच फेसबुकने भारतातील भाजप नेते आणि संबंधित काही पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून, फेसबुकच्या भूमिकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर फेसबुकने अखेर खुलासा केला आहे.

आपल्या वृत्तात वॉल स्ट्रीट जर्नलने असे म्हटले होते की, भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर नियमांनुसार फेसबुक-इंडियाने काढून टाकले नाहीत. भारत ही फेसबुकसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी फेसबुकने भाजप नेत्यांचा विद्वेषी मजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले.

देशातील राजकीय पक्षांनी फेसबुकच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणाऱ्या या वृत्तानंतर भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर भाजपच्या नियंत्रणात फेसबुक असल्याचा आरोप केला होता. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी या वादावर खुलासा केला आहे. आम्ही कोणचेही राजकीय वजन वा पक्षांशी संबंधाचा विचार न करता हिंसेला चिथावणी देणारी द्वेषयुक्त भाषण आणि लिखाणाला प्रतिबंधित करतो. जागतिक पातळीवर हेच धोरण अंमलात आणतो. आम्ही अचूकता व चांगुलपणा यांची निश्चितता करण्यासाठी या अमलबजावणीसंदर्भात प्रगतीवर आहोत आणि नियमितपणे या प्रक्रियेची आढावा घेत असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.