शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह; आरोग्यमंत्र्यांची माहिती


मुंबई: मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. पवारांची कोरोना चाचणी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आली असून त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश असल्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात शरद पवार कराडला गेले होते. या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील पॉझिटिव्ह आल्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. शरद पवारांच्या दोन स्वीय सचिवांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह असून दुसऱ्याचा प्रलंबित आहे.

वरळीतील एनएससीआय डोममध्ये उपचारांसाठी कोरोनाची लागण झालेल्या सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेने सिल्व्हर ओक परिसरात फिव्हर कॅम्पदेखील सुरू केला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबीयांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.