रशियाने सुरु केले कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन


मॉस्को : इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनास रशियाने सुरुवात केल्याचे वृत्त दिले आहे. ही लस मॉस्कोमधील गॅमालिया संस्थेमध्ये विकसित केली असून तिच्या उत्पादनास सुरुवात झाली असून ती लस या महिनाअखेर बाजारात येईल.

नुकतीच रशियाने कोरोना प्रतिबंधक लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली होती. पण या लसीबाबत जगातील वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यानंतर लस योग्य आहे किंवा नाही याची माहिती कळू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. रशियाने ही लस देण्यासाठी वयाची अट घातलेली आहे. १८ वर्षापेक्षा कमी आणि ६० हून अधिक वय असलेल्यांना ही लस देता येणार नसल्याचेही रशियाने स्पष्ट केले आहे.