सुप्रिया सुळेंनी धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा


मुंबई – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जुलै 2019 पासून सुरू होत्या. त्यातच धोनीने शनिवारी अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला.

भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीने अशी अचानक घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात त्याला अप्रत्यक्षपणे बीसीसीआयने देखील निवृत्तीचे संकेत दिलेले असल्यामुळे त्यांना कळवण्याआधीच धोनीने आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केले. जगभरातील चाहत्यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर नाराजी व्यक्त करताना, धोनीच्या आठवणी जागवल्या आहेत. त्याचबरोबर धोनीच्या कारकिर्दीचे राजकीय नेत्यांनीही कौतुक केले आहे.

धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीने आपल्या खेळातून जगाला एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचे सुप्रिया यांनी सूचवले आहे. भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच, पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसते, असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस. तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.