चीनला दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले टीक-टॉकची मालमत्ता विकण्याचा आदेश


वॉशिंग्टन : चिनी कंपनी असलेल्या बाइटडान्सला टीक-टॉक अ‍ॅपचा अमेरिकेतील संपूर्ण व्यवसाय विकण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला असून कंपनीला यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे. अमेरिकेच्या सुरक्षिततेला बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे धोका निर्माण झाला असून अमेरिकेकडे याचे पुरावेही असल्यामुळे हा कठोर निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.

गेल्याच आठवड्यात टीक-टॉक आणि वुईचॅटच्या मालकांसोबत व्यवहार करण्यावर ट्रम्प यांनी बंदी घातली होती. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणाला हे दोन्ही कंपन्यांमुळे धोका पोहचू शकतो. पण टीक-टॉकसंदर्भात अमेरिकेने दिलेल्या आदेशाचा नेमका काय अर्थ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अ‍ॅपचा अमेरिकेत १० कोटी लोक वापर करतात.

त्याचबरोबर ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांकडून घेतलेला किंवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत करण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील टीक-टॉकचा व्यवसाय विकत घेण्याबाबत मायक्रोसॉफ्टशी चर्चा सुरु आहे. मायक्रोस्फॉट किंवा अन्य कुठलीही कंपनी अमेरिकेतील टीक-टॉकचा व्यवसाय घेण्यास असमर्थ ठरली तर १५ सप्टेंबरपासून टीक-टॉकवर बंदी घातली जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.