पुढील आठवड्यापासून सुरु होणार पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा


पुणे : पुढील आठवड्यापासून मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीला पीएमपीएलची सेवा 22 तारखेला सुरु होण्याची शक्यता आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पीएमपीएल प्रशासनाने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.

प्रशासनाच्या मागणीला अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून त्यानुसार २२ तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलची सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्सव अतिशय साधेपद्धतीने साजरे केले जात आहेत. कोरोनाचे यंदाच्या गणेशोत्सवावर देखील सावट आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतकी वर्षे गणपतीची प्रतिष्ठापना कोतवाल चावडीत भव्य मांडव उभारून होत होती. ही १२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे. अतिशय साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.