अजित पवारांचा पार्थ प्रकरणावर बोलण्यास नकार


पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पार्थ पवार प्रकरणावर मौन अद्याप सोडले नाही. याचबरोबर मला या प्रकरणी काही बोलायचे नसून सध्यातरी मला माझे काम करु द्या, असे बोलत पार्थ पवार प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. अजित पवार आणि पार्थ पवार सध्या बारामतीत असल्यामुळे पार्थ पवार पुढे काय करणार? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पार्थ पवार यांनी शनिवारी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. अजित पवार पुण्यातील ध्वजारोहन आटोपल्यानंतर बारामतीत पोहचले, अजित पवार रविवारी सकाळपासून बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहेत. अजित पवार नियोजित दौऱ्याप्रमाणे बारामतीतील स्थानिक नागरिकांना भेटत असतात. पार्थ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. पण त्यावर अजित पवार यांनी अद्याप मौन बाळगले आहे.

पार्थ पवार यांनी घडलेल्या प्रकरणावर श्रीनिवास पवार यांच्या घरी चर्चा केली. अजित पवार आणि पार्थ पवार यांची आज दिवसभरात चर्चा होऊ शकते. काका श्रीनिवास पवार यांच्याकडून पार्थची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर पार्थची आत्या विजया पाटील यांनी पार्थ समजूतदार आहे, शरद पवारांना मी पहिल्यांदाच ऐवढे चिडलेले पाहिलेले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नीसह पुण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.