ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले असून नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर सरन्यायाधीश शरद बोबडे हे स्वार झाल्याचा फोटो पोस्ट केला होता आणि प्रशांत भूषण यांनी त्यावर टिप्पणी केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांच्या शिक्षेवर २० ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर पार पडली.

सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे ट्विटही प्रशांत भूषण यांनी केले होते. वकील महेश महेश्वरी यांनी हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेत भूषण यांच्याकडे दोन ट्विटबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाने २२ जुलै रोजी प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

नोटीशीला उत्तर देताना प्रशांत भूषण यांनी मतांची अभिव्यक्ती कितीही स्पष्ट, मान्य न होण्यासारखी आणि काहीजणांसाठी अप्रिय अशी असली, तरी न्यायालयाचा त्यामुळे अवमान होऊ शकत नसल्याचे म्हटेल आहे. तसेच न्यायाधीशांच्या वैयक्तिक वागण्यावर आपले ट्विट असून यामध्ये न्यायव्यवस्थेवर बोट ठेवण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. प्रशांत भूषण यांनी नोटीशीला उत्तर देत आपली बाजू मांडल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

भूषण यांच्यासह ट्विटर कंपनीलाही सर्वोच्च न्यायालयाने आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. भूषण यांचे दोन ट्विट ट्विटरने काढून का टाकले नाहीत, अशी विचारणा बुधवारी केली. न्यायालयाने त्यावरआदेश दिला तर हे ट्विट काढून टाकले जातील, पण ट्विटर ते स्वत:हून काढून टाकू शकत नसल्याचे न्यायालयात ट्विटरकडून सांगण्यात आले होते.