चाकरमान्यांच्या मदतीक धावलो गणपती बाप्पा..! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्यांची घोषणा


मुंबई – कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने गोडबातमी दिली असून गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या ट्रेन १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत धावणार असून ८२ अप तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन या काळात कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झाली होती. पण कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणासाठी या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून धावणार असून या ट्रेन सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरीसाठी धावतील. या विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. या ट्रेनचे बुकिंग उद्यापासून (१५ ऑगस्ट) सुरु होणार आहे. या ट्रेनमधून कंफर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा असणार आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या वत्तीने प्रवाशांना प्रवास करताना कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.