बिहार निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा मोठी जबाबदारी?


पाटणा : भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पाडणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अवघ्या काही महिन्यात बिहार विधानसभा निवडणूक होणार असून देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत काम पाहतील, असे वृत्त आहे. फडणवीस गुरुवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही उपस्थित असल्याची माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम नेते आहेत आणि ते निवडणुकांमध्ये उत्तम काम करतात, असे म्हणत सी.पी. ठाकूर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. यामध्ये मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यापासून इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आत्तापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. तर दुसरीकडे, निवडणूकपूर्व आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतही सुरू झाली असल्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात बिहारमध्ये राजकीय पारा वाढण्यासाठी शक्यता आहे.