नवी दिल्ली – आता ऑनलाइन मेडिसिन क्षेत्रात आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियाने एंट्री केली असून ऑनलाइन फार्मसी ही नवीन सेवा कंपनीने लाँच केली आहे. अॅमेझॉन या सेवेची सुरूवात बंगळुरूमधून करणार असून नंतरच्या काळात देशाच्या अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाईल. याबाबतची माहिती गुरूवारी अॅमेझॉनकडून देण्यात आली.
आता ऑनलाइन मेडिसिन क्षेत्रात ‘अॅमेझॉन’ची एंट्री
आपल्या सर्व ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून बंगळुरूमध्ये सध्या आम्ही अॅमेझॉन फार्मसी लाँच करत आहोत. ग्राहक याद्वारे प्रिस्क्रिप्शन आधारित औषधे घरबसल्या ऑर्डर करु शकतात. ग्राहकांसाठी या सेवेअंतर्गत औषधे, बेसिक हेल्थ डिव्हइस आणि प्रमाणपत्रधारक विक्रेत्यांकडून तसेच आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असतील. ही सेवा कोरोना संकटकाळात ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल, असे अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.
बहुतांश लोक सध्या कोरोनाच्या संकट काळात ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देत असून गेल्या काही महिन्यांत या संकटामुळे ऑनलाइन मेडिसिनच्या क्षेत्रात बरीच तेजी दिसून आली आहे. ऑनलाइन औषध खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत, याशिवाय ट्रीटमेंटसाठी देखील ऑनलाइन सल्ला घेतला जात आहे. प्रॅक्टो, नेटमेड्स, 1mg, फार्मईजी आणि मेडलाइफ यांसारख्या स्टार्टअप्सकडे ऑनलाइन सेवांची मागणी वाढली आहे. अशातच आता अॅमेझॉननेही या क्षेत्रात उडी घेतली आहे.