आनंदवार्ता…! स्वदेशी ‘Covaxin’ लसीने यशस्वीरित्या पार केला चाचणीचा पहिला टप्पा


संपूर्ण जगाला चीनकडून मिळालेल्या कोरोना या महामारीमुळे मनस्ताप करुन ठेवला आहे. त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणाऱ्या सतत होणाऱ्या वाढीमुळे संपूर्ण जग चिंतेत पडले आहे. या महामारीपासून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. याचदरम्यान रशियाने जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आणल्याची घोषणा केली, पण या लसीवर अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे.

जगासोबतच आपल्या देशातही कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचा प्रयत्न केला जात असून भारत बायोटेक-आयसीएमआरद्वारे कोवॅक्सिन नावाची लस यासाठी तयार करण्यात आली आहे. आता याच लसीच्या पहिल्या चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली असून चाचणीच्या सुरुवातीच्या निकालात असे म्हटले आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित असून देशातील सहा शहरांमध्ये भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला निर्मित या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.

देशातील १२ शहरांमधील ३७५ स्वयंसेवकांवर या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले असून सध्या त्यांचे परीक्षण केले जात आहे. पीजीआय रोहतक येथे सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लीडर सविता वर्मा म्हणाल्या, ही लस सुरक्षित असून ही लस आम्ही स्वयंसेवकांना दिल्यापासून त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम परिणाम झालेला नाही. आता स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्याची तयारी सुरू असून त्याआधी तपासकर्ते स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने गोळा करीत आहेत, त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांद्वारे या लसीच्या रोगप्रतिकारक शक्तीची चाचणी घेण्यात येईल.

त्याचबरोबर सविता वर्मा पुढे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात ही लस पूर्णपणे सुरक्षित ठरली असून आता आपण दुसर्‍या टप्प्यात लस किती प्रभावी आहे याची माहिती घेणार आहोत. त्यासाठी आम्ही रक्ताचे नमुने घेणे सुरू केले आहे. या लसीबाबत माहिती देताना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली (AIIMS) येथील प्रमुख तपासकर्ते संजय राय म्हणाले, ही लस सुरक्षित आहे. भारत बायोटेक लसीची चाचणी घेण्यासाठी एम्स येथे १६ स्वयंसेवकांना दाखल करण्यात आले आहे.

आपला देश देखील सुरक्षित कोरोना प्रतिबंध लस बनविण्याच्या या शर्यतीतही सहभागी आहे. या सर्व घडामोडींकडे सरकार स्वतः लक्ष ठेवून आहे. कोवॅक्सिन ही भारताची पहिली लस आहे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केली आहे. सर्व १२ ठिकाणांहून सुरक्षिततेचे निकाल पाहिल्यानंतर आता कंपनी दुसर्‍या टप्प्यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी संपर्क साधेल. दुसर्‍या वैज्ञानिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जर सर्व काही ठीक झाले तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही लस उपलब्ध होईल.