एअर इंडियासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत बोली लावणार टाटा ग्रुप ?


नवी दिल्ली – भारतातील पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या टाटा एअरवेज या कंपनीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि एअर इंडिया असे तिचे नामकरण करण्यात आले. पण सुमारे 30 हजार कोटींपेक्षा जास्त कर्जात असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असून ही कंपनी विकत घेण्यास पुन्हा टाटा समूहच पुढे येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान एअर इंडियाचे मूल्यांकन करण्यास टाटा ग्रुपने सुरूवात केली असून टाटा ग्रुप या महिन्याच्या अखेरपर्यंत एअर इंडियासाठी बोली लावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

पण, मूल्यांकनाची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, यावर तोपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. या प्रस्तावाचे कंपनी सध्या मूल्यांकन करत असून मूल्यांकन झाल्यानंतर योग्य वेळीच कंपनी बोली लावेल, असे टाटा सन्सच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या कंपनीची आर्थिक भागीदार आणण्यासंबंधी कोणतीही योजना नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टाटा ग्रुप सध्या एअर इंडियाच्या योग्य मूल्यांकनासाठी कायदेशीर सल्ला घेत असून त्याबाबत सल्लांगारांसोबतही चर्चा करत आहे. लवकरच एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया यांचे टाटा ग्रुप विलीनीकरण करु शकते, अशीही चर्चा आहे. टाटा सन्सची एअर एशिया इंडियामध्ये 51 टक्के भागीदारी आहे. म्हणजे एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांचे विलीनीकरण होऊन केवळ एअर एशिया इंडिया कंपनी राहील, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एअर एशिया इंडिया व्यतिरिक्त ‘विस्तारा’ या विमान कंपनीमध्येही टाटा ग्रुपची भागीदारी आहे. टाटाशिवाय ‘विस्तारा’मध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 49 टक्के भागीदारी आहे.

पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचे टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर एअर इंडियाला खरेदी करणे किचकट प्रस्ताव असून यासाठी कायदेशीर प्रक्रियांचे ज्ञान, तसेच स्टेकहोल्डर्सचं समर्थन आणि सरकारच्या मदतीचीही आवश्यकता असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.