उद्यापासून ठाण्यातील सर्व दुकाने यावेळेत राहणार खुली !


ठाणे : राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकाने उघडणार आहेत. उद्यापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून ठाणे महानगरपालिकेने सर्व दुकाने आठवड्याचे सातही दिवस खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत शिक्कामोतर्ब करण्यात आले.

P1 आणि P2 नुसार ठाणे शहरातील जी आस्थापने सुरु होती, ती 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसेच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून या दरम्यान ठाणे महानगरपालिका चांगले काम करत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे व्यापारी संघटनांच्या बैठकीत म्हणाले. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली पार पडलेल्या या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जून महिन्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2 ते 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर P1 आणि P2 पद्धतीने दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. लॉकडाऊनमुळे आधीचे चार महिने दुकाने बंद होती. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सम-विषय नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता.

सध्या सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस सर्वच दुकाने सुरु ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 13 ऑगस्ट रोजी या मागणीला मान्यता दिली.