बोंबला….! ७० हजारी होणार सोने; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात सलगच्या दरवाढीने सोने तसेच चांदीच्या दराने विक्रमी टप्पा गाठला होता. ५६ हजार रुपयांपुढे तोळ्याला वाटचाल करणारे सोने तसेच चांदी किलोसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सोने १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांवर गेल्यापासून गुंतवणूकदार, खरेदीदारांचाही मौल्यवान धातूकडील ओघ आपसूकच वाढू लागला.

सोने दर गेल्या महिन्याभरात थेट ४० टक्क्यांनी वाढले. तर ही दरवाढ मागील दोन वर्षांमध्ये ७५ टक्के एवढी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याचे दर केवळ सन २०२० मध्येच ३० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील संभ्रम कायम असल्याने सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आल्याने ही दरवाढ दिसून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण सोन्याचे दर आगामी काळात आणखीन वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

या पिवळ्या धातूचे दर ऑक्टोबर २०१८ पासून सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामुळेही सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येते. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या या दोन देशांमध्ये या वर्षातही अनेकदा वैचारिक आणि आर्थिक संघर्ष पहायला मिळाला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे आलेली आर्थिक मंदी आणि संकट लवकर दूर होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

सध्या सोन्याचे भाव पडले असले तरी सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठतील, असा अंदाज आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दिर्घकालीन विचार केल्यास सोन्याचा दर प्रती १० ग्रामसाठी थेट ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी मागील अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या या दरवाढीचा फायदा घ्यावा, असा सल्लाही या अहवालामध्ये देण्यात आला आहे.

सोन्याच्या किंमतीमध्ये मागील पाच दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढ होताना दिसल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. सोन्याचे दर मागील तीन ते चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून ते भविष्यातही वाढणार असल्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अहवालात पुढील काही वर्षे सोन्याच्या दरांमध्ये वाढच होणार असल्याचे म्हटले आहे.

सध्याच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनिश्चितता वाढलेली आहे. त्याचबरोबर जागतिक वाढ आणि मानवी जीवनासंदर्भातील चिंताही वाढली आहे. या परिस्थितीचा नक्कीच काहीतरी वेगळ्या दृष्टीने रोखे आणि सोन्यासारख्या संपत्तीचा मोठा साठा असलेल्या अमेरिकेसारखा देश विचार करत असणारा. पण असे असले तरी मागील काही काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ ही आश्चर्यचकित करणारी असल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

कोरोनाच्या कालावधीत असलेली अस्थिरता जागतिक शेअर बाजार, वस्तू आणि चलन बाजारामध्ये पाहता सध्या सोने बाजाराला चांगली मागणी आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अनेक देशांमधील केंद्रीय बँकांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. व्याजदर कमी करण्याचा निर्णयही अनेक बँकांनी घेतला आहे. जागतिक स्तरावरील केंद्रीय बँकर्सचा सोने खरेदीमधील रस वाढल्याने भविष्यातही सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते. एकूणच गुंतवणूकीच्या ५ ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये केल्यास फायदा होऊ शकतो, असा सल्ला भारतीय गुंतवणूकदारांना या अहवालामध्ये देण्यात आला आहे.