प्रसिद्ध मराठमोळ्या यूट्यूबर ‘दादुस’ला कोरोनाची लागण


मागील अनेक महिन्यांपासून देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यातच या महामारीने देशातील अनेक क्षेत्रातील मंडळींना आपल्या विळख्यात घेतल्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला देतच असतो. त्यातच आता प्रसिद्ध यूट्यूबर, आगरी कॉमेडीअन विनायक माळीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः विनायकने सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विनायकने कोरोना चाचणीचा रिपोर्टही पोस्ट केले आहे, त्यानुसार 28 वर्षीय विनायकची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे दिसून येत आहे.

यूट्यूबवर सध्याच्या फार कमी मराठी विनोदी वाहिन्या आहेत, ज्याद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते. त्यातीलच एक विनायक माळीचे चॅनेल आहे. मुख्यत्वे आगरी भाषेत विनायकचे व्हिडिओ हे असतात आणि त्याचे हे व्हिडिओ प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मोठ्या प्रमाणात ते शेअरही होत असतात. त्याच विनायकला आता कोरोनाची लागण झाली आहे. याआधी त्याने फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, आपल्या शरीरात काही नको असलेले विषाणू आढळल्याने आपण कामापासून थोडा ब्रेक घेत आहोत.

त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये विनायक म्हणतो, सर्व लोक बरे होत आहेत आणि माझी अवस्था बेकार झाली आहे. या बातमीनंतर अनेकांनी विनायकला संदेश पाठवून, त्याच्या पोस्ट खाली कमेंट करून त्याच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना केली आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

यूट्यूबवर सध्या विनायकचे 1.18 मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत. विनायक हे व्हिडिओ साधारण तीन वर्षांपासून पोस्ट करत आहे. विनायकने याआधी हिंदी भाषेत काही व्हिडिओ पोस्ट केले होते, पण त्याला म्हणावे तसे यश न मिळाल्याने त्याने मराठी भाषेकडे मोर्चा वळवला. त्याचे हे मराठी व्हिडिओ एवढे लोकप्रिय झाले आहेत की आता विनायकला त्याचे चाहते ‘आगरी किंग’ म्हणून ओळखू लागले आहेत. अशाप्रकारे टिकटॉक, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या युगात विनायकने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.