चीनमधील कोरोनामुक्त महिलेला पाच महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण


हुबेई – चीनमधील कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे चिनी आरोग्य अधिकारी आणि तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची लागण ६८ वर्षीय महिलेला झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पुन्हा एकदा पाच महिन्यांनी महिलेला कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. यासंदर्भातील वृत्त ग्लोबल टाइम्सने दिले आहे.

हुबेई प्रांतातील रुग्णालयात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून या कोरोनामुक्त महिलेला फेब्रुवारी महिन्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. ग्लोबल टाइम्सशी बोलताना शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा या दुर्मिळ प्रकरणातून विषाणू शरीरातून नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेत असल्याचे समोर येत आहे. त्यांनी यावेळी कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा लागण झालेल्या व्यक्ती संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इतर माध्यमानुसार ९ ऑगस्टला ६८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिला सध्या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आढळले आहेत. या प्रकरणावरुन कोरोना व्हायरस शरीरातून पूर्ण नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेईल, असे निदर्शनास येत आहे. विषाणूंचे प्रमाण काही रुग्णांच्या शरीरात कमी असल्यामुळेच महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असण्याची शक्यता असल्याचे वुहान विद्यापीठातील रोगकारक जीवशास्त्र विभागाचे यांग झांकीऊ यांनी सांगितले आहे.