देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २४ लाखांच्या उंबरठ्यावर


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची दररोज नोंद होत आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही देशातील कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासांत ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर ९४२ जणांनी आपला जीव गमावला आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. २३ लाख ९६ हजार ६३८ ऐवढी देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात सहा लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर याच्या दुपटीपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तर ४७ हजार ३३ जणांचा देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. भारत १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता.

भारत आता दररोज होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे चौथ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा भारतात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये ४६ हजार ७०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे.

भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर १४.९ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानी असलेल्या ब्रिटनलाही भारताने मागे टाकले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (१ लाख ६८ हजार २१९), ब्राझील (एक लाख ३ हजार ९९), मेक्सिको (५३ हजार ९२९) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.