माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक


नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून यासंदर्भात शर्मिष्ठा यांनी एक ट्विट करत माझ्या वडिलांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आल्याने मागील वर्षी ८ ऑगस्ट हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता. अगदी एक वर्षानंतर ते १० ऑगस्टला गंभीर आजारी पडले आहेत. त्यांच्यासाठी देव सर्व काही चांगले करु दे आणि मला जीवनातील सुख आणि दु: ख दोघांबाबत समान पद्धतीने स्वीकारण्याची शक्ती देवो, त्यांची चिंता व्यक्त करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते, असे म्हटले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी दुपारी सैनिकी रुग्णालयात प्रणव मुखर्जी यांना दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिन असे सांगण्यात आले आहे की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. माजी राष्ट्रपतींच्या मेंदूवर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी जमा झाली होती. तथापि, अद्याप त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसलेली नाही आणि परिस्थिती नाजूक होत गेली आहे.

रुग्णालयाने यापूर्वी म्हटले होते की, १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:१२वाजता गंभीर परिस्थितीत माजी राष्ट्रपतींना दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठी गाठ आहे, ज्यासाठी त्यानी आपत्कालीन व्हेंटिलेटर शस्त्रक्रिया केली आहे. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे. माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची डॉक्टरांची विशेष टीम सतत काळजी घेत आहे.