मराठमोळे ‘लय भारी’ दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती अत्यंत नाजूक


संदीप कुलकर्णी अभिनीत ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने निशिकांत कामत ग्रस्त असून गेल्या 10 दिवसांपासून निशिकांत यांना या आजारामुळे हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला निर्माते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी दिली आहे. अमेय खोपकर यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेले निशिकांत कामत हे गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत गंभीर पण स्थिर अवस्थेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निशिकांत कामत यांना लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले आहे. सध्या त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली आहे.

पाच वर्षापूर्वी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत निशिकांत कामत यांनी ‘दृष्यम’, इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’, जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि रॉकी हँडसम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये ‘डोंबिवली फास्ट’ व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन ‘लय भारी’, ‘फुगे’ या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘सातच्या आत घरात’ हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.