संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग!


अभिनेता संजय दत्त याने आपल्या आयुष्यात किती चढऊतार आले हे आपण त्याच्या बायोपिकमधून पाहिलेच आहे. अनेक अडचणींवर मात करत तो पुन्हा त्याच दिमतीने उभा देखील राहिला. पण आता त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक दुखःद घटना घडली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यावर उपचारासाठी तो परदेशात जाण्याची शक्यता आहे. संजय दत्तला काही दिवसांपूर्वीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काल त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. यावेळी संजय दत्तची कोरोना टेस्टही करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. पण तब्येत ठीक नसल्याचे सांगत संजय दत्तने आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कर्करोग असल्याने संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता आहे.

संजय दत्तने उपचारांसाठी कामातून ब्रेक असल्याचे ट्विट केल्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगू लागल्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचा दावा कोमल नाहता यांनी केला. दरम्यान आपल्या ट्विटमध्ये संजय दत्तने, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी मी सध्या कामातून ब्रेक घेत आहे. मित्र परिवार आणि कुटुंब सोबत आहे, उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचे प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परत येईन, असे म्हटले होते.