…मग स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका – करीना कपूर


बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्या रोषाचा सामना सोशल मीडियावर वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यासारख्या अनेक स्टारकिड्सना करावा लागत आहे. त्याचबरोबर या ट्रोलिंगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले असून यावर अनेक कलाकारांनी आपले मत देखील मांडले आहे. पण आता अभिनेत्री करीना कपूर खानने याविषयी आपले मत वक्तव्य केले आहे.

सोशल मीडियावर करीना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये ती मग तुम्ही स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका, असे सांगताना दिसत आहे. करीना आपल्या या वक्तव्यामुळे आता नेटकऱ्यांच्या जाळ्यात अडकली आहे. तिला घराणेशाही आणि स्टारकिड्स यांच्याशी संबंधीत प्रश्न मोजो न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.

ती यावर म्हणाली, कोणाला स्टार बनवायचे हे फक्त प्रेक्षकांच्या हाती असते. तुम्हाला जर स्टार किड्सपासून समस्या असतील तर त्यांचे चित्रपट पाहू नका. तिच्या या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. परिणामी करीनाचा आगामी ‘लालसिंग चड्ढा’चित्रपट बॉयकोट करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. २०२१मध्ये नाताळला ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.