स्वरा भास्करकडून रिया चक्रवर्तीचे समर्थन


अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी केली जात असून रियावर आर्थिक फसवणूकीचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. परिणामी सोशल मीडियाद्वारे रियावर सुशांतच्या चाहत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात रियाने माध्यमांविरोधात याचिका दाखल केली. आता अभिनेत्री स्वरा भास्करने या याचिकेला पाठिंबा दिला आहे. न्यायालयाने रिया विरोधात अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी अशी मागणी तिने केली आहे.

एका विचित्र आणि धोकादायक मीडिया ट्रायलचा सामना रियाला करावा लागत आहे. या प्रकाराकडे सर्वोच्च न्यायालयाने गांभिर्याने लक्ष द्यावे. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी, अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने रिया चक्रवर्तीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे ट्विट चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.