न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनी फडकणार तिरंगा !


न्यूयॉर्क : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकेतील एका ग्रुपने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच न्यूयॉर्क शहरातील या खास स्थानावर तिरंगा फडकणार आहे. तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून 15 ऑगस्ट 2020 रोजी इतिहास रचण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमध्ये या निमित्ताने भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

तत्पूर्वी अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये विशाल बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचे थ्री डी फोटो झळकले होते. विशाल नॅस्डेक स्क्रीन व्यतिरिक्त 17,000 चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटों प्रदर्शित केले गेले होते. दरम्यान, टाइम्स स्क्वेअरवर लावण्यात आलेला बिलबोर्ड जगातील सर्वात मोठा आणि आकर्षक बिलबोर्डपैकी एक आहे. तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.