बैरुत स्फोटाचे पडसाद; लेबनॉनच्या पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा


बैरुत : लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या विध्वंसक विस्फोटानंतर आठवड्याभरातच लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) संध्याकाळी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधान हसन दियाब यांनी स्वत: याची घोषणा केली.

पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. पण या घटनेला जबाबदार असलेल्या संपूर्ण सरकारनेच राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर काल संध्याकाळी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना नवी मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असे सांगितले आहे.

लेबनॉनची जनता सरकार भ्रष्टाचारी आणि अयोग्य असल्याचा आरोप करत होती. संतप्त नागरिकांचे सलग तीन ते चार दिवसांपासून आंदोलन सुरु असून अनेक ठिकाणी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. अनेक वर्षांपासून बंदरावर असुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या 2750 टन अमोनियम नायट्रेटचा मागील मंगळवारी स्फोट झाला, ज्यात 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढून 220 झाली आहे. बेरुतचे राज्यपाल मरवान अबूद यांच्या माहितीनुसार अजूनही 110 जण बेपत्ता आहेत. यापैकी बहुतांश परदेशी कर्मचारी आणि ट्रक चालक आहेत.