… म्हणून स्टुअर्ट ब्रॉडला रेफरी असलेल्या वडिलांनीच ठोठावला दंड

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी स्पिनर यासिर शाह विरोधात अनुचित भाषा वापरणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सामन्याच्या फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा दंड सामन्याचे रेफरी आणि स्टुअर्ट ब्रॉडचे वडील असलेल्या ख्रिस ब्रॉड यांनी ठोठावल्याने याची विशेष चर्चा आहे.

ब्रॉडने शाहला आउट केल्यानंतर अनुचित भाषा वापरली. यानंतर त्याला आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावला. सोबत त्याला एक डिमेरिट अंक देण्यात आला आहे. मागील 24 महिन्यातील त्याने तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे.

क्रिकेटच्या इतिहासात असेल कदाचित पहिल्यांदाच घडले असावे, जेव्हा रेफरी असलेल्या वडिलांनीच मुलाला शिक्षा दिली आहे. या सामन्यात ख्रिस ब्रॉड रेफरी होते, त्यामुळे त्यांनी आयसीसीच्या नियमांतर्गत दंड ठोठावला.

यावर ब्रॉडने देखील मजेशीर ट्विट करत लिहिले की, त्यांना ख्रिसमसला देण्यात येणाऱ्या गिफ्ट आणि कार्ड्सच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ब्रॉर्डच्या वडिलांबद्दल सांगायचे तर, ख्रिस ब्रॉड हे 25 कसोटी सामने खेळले आहेत.