धक्कादायक! चीनमध्ये दुसऱ्यांदा सीफूड पॅकेजिंगवर आढळला कोरोना व्हायरस

चीनच्या वुहान शहरातील सीफूड बाजारातून कोरोना व्हायरस जगभरात पसरल्याचे सांगितले जाते. आता पुन्हा एकदा चीनमध्ये आयात केलेल्या गोठलेल्या (फ्रोझन) सीफूड पॅकेजिंगवर कोरोना व्हायरस आढळला आहे. चीनच्या यानताई शहरातील तीन कंपन्यांनी पोर्ट सिटी असलेल्या डालियान येथून सीफूड खरेदी केले होते. याच सीफूड पॅकेजिंगवर व्हायरस आढळला.

यानताइ शहराच्या प्रशासनाने सांगितले की, डालियान येथून आयात करण्यात आलेल्या सीफूडवर व्हायरस आढळला. मात्र व्हायरस त्यावर कसा आला याची माहिती मिळाली नाही. जुलैमध्ये देखील इक्वाडोरवरून आयात करण्यात आलेल्या फ्रोझन सीफूडवर देखील व्हायरस आढळला होता. त्यानंतर चीनने कोळंबी माशाचे उत्पादन करणाऱ्या तीन इक्वाडोरच्या कंपन्यांसोबतचा व्यापार काही काळासाठी बंद केला होता.

कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातील सीफूड बाजारातूनच जगभरात पसरल्याचे सांगितले जाते. यानताइ येथील कंपन्यांनी मागवलेल्या काही सीफूडची पुन्हा निर्यात करण्यात आली असून, तर काही शीतगृहात ठेवण्यात आले आहे. बाजारात याची विक्री करण्यात आलेली नाही.

या वस्तूंशी संबंध येणाऱ्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, सर्वांची चाचणी नेगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.